Monday, September 14, 2015

Grace कविता part 2

देखणा कबीर’ [संध्याकाळच्या कविता]
“दिशावेगळ्या नभांची
गेली तुटून कमान ;
तुझ्या व्रतस्थ दुखाचे
तरी सरे ना ईमान !
जन्म संपले तळाशी
आणि पुसल्या मी खुणा ;
तरी वाटांच्या नशीबी
तुझ्या पायांच्या यातना
भोळ्या प्रतिज्ञा शब्दांच्या
गेली अर्थालाही चीर ;
कांचा वेगळ्या पार्‍यात
तरी देखणा कबीर !!”

असे रंग आणि ढगांच्या किनारी
निळे ऊन लागे मला साजणी
निळे घाटमाथे निळ्या राउळांचे
निळाईत माझी भिजे पापणी
निळ्याशार मंदार पाउलवाटा
धुक्याची निळी भूल लागे कुणा
तुला प्रार्थनांचे किती अर्घ्य वाहू
निळ्या अस्तकालीन नारायणा
निळे गार वारे जळाची शिराणी
निळ्या चंद्रओवीत संध्या डुले
निळे दुःख चोचीत घेउन आली
निळ्या पाखरांची निळी पाउले

 “तू उदास मी उदास मेघहि उदासले 
स्मृतीतले विदग्ध नाद पैंजणात सांडले !
तुझ्या तनूंत चंद्रशिल्प सांजली निळी जळे 
जसा समुद्र आंधळा नि सूर्य दूर मावळे….”

“भय इथले संपत नाही...मज तुझी आठवण येते...
मी संध्याकाळी गातो...तू मला शिकविली गीते...
देऊळ पलिकडे तरीही, तुज ओंजळ फुटला खांब
थरथरत्या बुबूळापाशी, मी उरला सुरला थेंब
संध्येतील कमल फ़ुलासम, मी नटलो श्रृंगाराने
देहाच्या भवती रिंगण, घालती निळाईत राने
स्त्रोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दु:ख्ख कुणाचे
हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे
ते धुके अवेळी होते, की परतायची घाई
मेंदुतून ढळली माझ्या, निष्पर्ण तरुंची राई"

Grace कविता part 1

उखाणा' [संध्याकाळच्या कविता] 
“शुभ्र अस्थींच्या धुक्यात
खोल दिठीतली वेणा ;
निळ्या आकाश-रेषेत
जळे भगवी वासना.
पुढे मिटला काळोख __
झाली देऊळ पापणी;
आता हळूच टाकीन
मऊ सशाचा उखाणा.”


मंदिरे सुनी सुनी
कुठे न दीप काजवा
मेघवाहि श्रावणात
ये सुगंधी गारवा
रात्र सुर पेरुनी
अशी हळू हळू भरे
समोरच्या धुक्यातली
उठून चालली घरे
गळ्यात शब्द गोठले
अशांतता दिसे घनी
दु:ख बांधुनी असे
क्षितीज झाकिले कुणी?
एकदाच व्याकुळा
प्रतिध्वनित हाक दे
देह कोसळून हा
नदीत मुक्त वाहु दे..

भूपाळी [चंद्रमाधवीचे प्रदेश ]
ती खिन्न भुपाळी 
फिकट धुक्याचा घाट 
वर संथ निळाइत 
नारिंगाची वाट 
ती कातर काळी
तमगर्भाची नगरी
तेजात वितळली ,
स्तंभ उभे जरतारी
अन सावट मंथर
कृष्ण घनांची छाया
ओवीत मिसळली
हंबरणारी माया
हा पिवळा शेला
आज तुझ्या अभिसारा
घे गंध फुलांचा
जशी उन्हाची मधुरा

Sunday, August 30, 2015

पावसा


पाऊस


तुझी आठवण

तू मिठीत येऊन जा, वा आभास दे ना जरा
तुझी आठवण देतच आहे.. तूही त्रास दे ना जरा..
किती सांगायचे आहेत स्वप्नांचे शब्दझुले तुला
पण कारण एक लिहाया पत्रास दे ना जरा..
तू नसताना सुख नको, हे दु:ख लाडके माझे..
परतून ये... अन वेदनांची आरास दे ना जरा..
तो क्षण आठवला प्रेमाचा, अन गीत उमटले नवे
तू साथ तुझ्या स्वरांची.. अर्थास दे ना जरा..
मी प्याल्यातली 'रसिका' तुझी, मी फेसाळलेली कल्पना
तू स्वतःसही माझा कधी.. हव्यास दे ना जरा..
- रसिका
२३/७/२०१५

तू..भाग १

गंधार तुझ्या स्पर्शाचा अलवार स्पर्शूनी जावा
घनगर्द सांजेला जणू राधेला कृष्ण मिळावा..
असा तू..माझा कृष्ण..तुझा प्रत्येक शब्द एक आठवण बनून राहीला आहे....का आलास तू माझ्या आयुष्यात? वार्याच्या थंड झुळूकीप्रमाणे आलास आणी मग एक धुंद वादळ होऊन मला उध्वस्त करून गेलास..नंतर मी आपली शोधतेय..माझ्या मनाचे तुकडे..खरच असच असत का प्रेम? शांत तरी उध्वस्त..संथ तरी इतक वाहवते की की एका क्षणात सगळ आयुष्य जगून जाव आपण..
तू आहेस चंद्रमा म्हणून भरती मला आली..प्रत्येक शब्द तुझा..असा ओघवता..असा अलवार की मनास भिडून जावा..तुझ्या एका शब्दासाठी जग जिंकेंन मी..तू परत भेटशील का? खरा तर माहीत नाहीए मी तुला परत पाहु शकेन की नाही..स्वतमधल सगळ प्रेम, मन, आत्मा, स्वत्व बाहेर काढाव, सूर्याच्या किरणानी ते उजळून निघाव, चांदण्यानी त्यावर मखमली मुलामा द्यावा..आणी प्राजक्ताच्या सुगंधात ते भिजवून माझ्यापुढे सादर कराव, अस काहीस तू समोर आल्यावर वाटत....
तू आरसा आहेस..माझा मनाचा..तुझी प्रत्येक नजर म्हणजे माझ्या हृदयाची स्पंदन आहेत..इतका तू जवळचा...पण..तरीही तू माझ्याकडे पाहिलस की मी लपायला जागा शोधते..तुझ्याच मिठीत..दुसरा कुठे आधार आहे मला? दुसर अस्तित्वच उरला नाहीए माझे..तू ऐकतोयस ना? मी तुझ्या हृदयाच्या एकेक ठोक्यात आहे..तुझ्या प्रत्येक श्वासात आहे..मला दूर करू शकणारच नाहीयस तू..मग हा दुरावा का? ये परत चांदण्यात फिरूया..परत तो क्षण जागवूया..ये..खरच परत ये आज..
प्रत्येक श्वास धावतो तुझ्या सावलीमागे..
आयुष्यभर शोधेन तुला, आज जरासा मिळून जा..
क्रमश:

चांदणचुरा

चांदणचुरा हा शब्द बरेच दिवस मनात घर करून होता..त्यासाठीच केलेला हा प्रयत्न!
दिवस सरतो सोनसळी, रंगांची अवचित दाटी
केशर ओली सांज भेटते कालिंदीच्या काठी
बहरत जाते आसावरी, दरवळती फूलथवे
निळासावळ्या रात्रीला चांदरुपेरी स्पर्श नवे
स्तब्ध शांत पाण्यावरती चंद्रकोर ती हिंदकळे
चांदफुलांनां वेलींना अनंतरांची जोड मिळे
सावळ्या कुंतली धरतीच्या जाईचा पडदा शुभ्र दिसे
प्रेमविरहीणी नवथर कोणी मुखचंद्रमा झाकितसे
चांदणे पिऊन वार्‍याला रातीची मग नशा चढे
स्वप्नांच्या दारी अलगद तेव्हा तृप्तीची चाहूल पडे
उमजत जाते..समजत जाते..रात्र भासते गंधितशी
बासुरीचे होते मन अन सावळ्याची साद जशी
गाभार्यातून जाग येते भूपाच्या पहिल्या स्वरा
धुके पसरते पहाटेवरी उधळून चांदणचुरा!!
- रसिका