Tuesday, January 13, 2015

आठवणीतील कविता

पारवा

भिंत खचली कलथून खांब गेला
जुनी पडकी उद्ध्वस्त धर्मशाला
तिच्या कौलारी बसुनी पारवा तो
खिन्न नीरस एकांतगीत गातो

सूर्य मध्यान्ही उभा राहे
घार मंडळ त्याभवती घालताहे
पक्षी पानांच्या शांत सावल्यांत
सुखे साखरझोपेत पेंगतात.

तुला नाही परि हौस उडायाची
गोड हिरव्या झुबक्यात दडायाची
उष्ण झळ्या बाहेर तापतात
गीतनिद्रा तव आंत अखंडित

चित्त किंवा तव कोवळ्या विखारे
दुखतेखुपते का सांग सांग बा रे
तुला काही जगतात नको मान
गोड गावे मग भान हे कुठून

झोप सौख्यानंदात मानवाची
पुरी क्षणही कोठून टिकायाची
दुःखनिद्रे निद्रिस्त बुध्दराज
करूणगीते घुमवीत जगी आज.

दुःखनिद्रा ती आज तुला लागे
तुझे जगही निद्रिस्त तुझ्या संगे
फिरे माझ्या जगतात उष्ण वारे
तुला त्याचे भानही नसे बा रे.


कवी - बालकवी

हजार जिव्हा तुझ्या गर्जु दे प्रतिध्वनिने त्या
समुद्रा, डळमलु दे तारे !
विराट वादळ हेलकाउदे पर्वत पाण्याचे 
ढळुदे दिशाकोन सारे !

ताम्रसुरा प्राशुन मातुदे दैत्य नभामधले
दडुद्या पाताळी सविता
आणि तयांची ही अधिराणी दुभंग धरणीला
करायला पाजुळुदे पलीता !

की स्वर्गातुन कोसळलेला, सुड समाधान
मिळाया प्रमत्त थैमान
जमवुनी मेळा वेताळांचा या दर्यावरती 
करी हे तांडव थैमान

पदच्युता ,तव भिषन नर्तन असेच चालु दे 
फ़ुटुदे नभ माथ्यावरती
आणि , तुटुदे अखंड ऊल्का वर्षावात अग्नी
नाविका ना कुठली भिती

सहकार्यानो, का हि खंत जन्म खलाशाचा 
झूंजण्या अखंड संग्राम
नक्षत्रापरी असीम नभामध्ये संचरावे
दिशांचे आम्हांला धाम

काय सागरी तारू लोटले परताया लोटले
असे का आपुला बाणा
त्याहुनी घेऊ जळी समाधि सुखे , कशासाठी 
जपावे पराभुत प्राणा

कोट्यावधी जगतात जिवाणु जगती अन मरती
जशी ती गवताची पाती
नाविक आम्ही परंतु फ़िरतो सात नभांखाली
निर्मीतो नव क्षितिजे पूढती !

मार्ग आमुचा ना रोधु शकतिल ना धन, ना दारा
घराची वा वितभर कारा 
मानवतेचे निशान मिरवू महासागरात 
जिंकु खंड खंड सारा !

चला उभारा श्रुभ शिडे ति गर्वाने वरती
कथा या खुळ्या सागराला 
? अनंत आमुची ध्येयसक्ती अनंत अन आशा
किनारा तुला पामराला ? 

.........कुसुमाग्रज

न्हालेल्या जणू गर्भवतीच्या, सोज्वळ मोहकतेने बंदर
मुंबापुरीचे उजळीत येई, माघामधली प्रभात सुंदर
सचेतनांचा हुरूप शीतल, अचेतनांचा वास कोवळा
हवेत जाती मिसळून दोन्ही, पितात सारे गोड हिवाळा

डोकी अलगद घरे उचलती, काळोखाच्या उशीवरूनी
पिवळे हंडे भरून गवळी, कावड नेती मान मोडुनी
नितळ न्याहारीस हिरवी झाडे, काळा वायु हळुच घेती
संथ बिलंदर लाटांमधुनी, सागरपक्षी सूर्य वेचती

गंजदार पांढर्‍या नि काळ्या, मिरवीत रंगा अन नारंगी
धक्क्यावरच्या अजून बोटी, साखरझोपेमधे फिरंगी
कुठे धुराचा जळका परिमल, गरम चहाचा पत्ती गंध
कुठे डांबरी रस्त्यावरचा, भुर्‍या शांततेचा निशिगंध

या सृष्टीच्या निवांत पोटी, परंतु लपली सैरावैरा
अजस्त्र धांदल क्षणात देईल, जिवंततेचे अर्ध्य भास्करा
थांब जरासा वेळ तोवरी, अचेतनांचा वास कोवळा
सचेतनांचा हुरूप शीतल, उरे घोटभर गोड हिवाळा

बा. सी. मर्ढेकर

No comments:

Post a Comment