Sunday, August 30, 2015

चांदणचुरा

चांदणचुरा हा शब्द बरेच दिवस मनात घर करून होता..त्यासाठीच केलेला हा प्रयत्न!
दिवस सरतो सोनसळी, रंगांची अवचित दाटी
केशर ओली सांज भेटते कालिंदीच्या काठी
बहरत जाते आसावरी, दरवळती फूलथवे
निळासावळ्या रात्रीला चांदरुपेरी स्पर्श नवे
स्तब्ध शांत पाण्यावरती चंद्रकोर ती हिंदकळे
चांदफुलांनां वेलींना अनंतरांची जोड मिळे
सावळ्या कुंतली धरतीच्या जाईचा पडदा शुभ्र दिसे
प्रेमविरहीणी नवथर कोणी मुखचंद्रमा झाकितसे
चांदणे पिऊन वार्‍याला रातीची मग नशा चढे
स्वप्नांच्या दारी अलगद तेव्हा तृप्तीची चाहूल पडे
उमजत जाते..समजत जाते..रात्र भासते गंधितशी
बासुरीचे होते मन अन सावळ्याची साद जशी
गाभार्यातून जाग येते भूपाच्या पहिल्या स्वरा
धुके पसरते पहाटेवरी उधळून चांदणचुरा!!
- रसिका

No comments:

Post a Comment